Pune Crime – अवैध सावकारी, अमानुष व्याजदर, मारहाण, बंदुकीचा धाक आणि जबरदस्तीने जमीन बळकावण्याचा धक्कादायक प्रकार उरुळी कांचन परिसरात उघडकीस आला असून छळाला कंटाळून एका तरुण व्यावसायिकाने सोरतापवाडी (ता. हवेली) येथील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. महादेव विठ्ठल जरांडे (वय 36, रा. स्वरगंधार सोसायटी, उरुळी कांचन), असे पीडिताचे नाव आहे. सध्या ते कोरेगाव मूळ येथील एका खाजगी आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अनंता पवार, माऊली पवार, दीपाली साळुंखे व विजय पांडुरंग गोते, असे खासगी सावकारांची नावे आहेत.हडपसर येथील अनंता व माऊली पवार यांनी व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाखाली सुरुवातीला रक्कम दिली. मात्र, पैशांचे रूपांतर लवकरच अवैध सावकारीत झाले. 8 ते 10 टक्के मासिक व्याज, वेळेवर पैसे न दिल्यास दुप्पट व्याज, रोजचा फोनवरून व प्रत्यक्ष तगादा आणि उघड धमक्या देणे असा छळ सुरू झाला. एकूण 53 लाख 89 हजार रुपये घेतल्यानंतरही पीडिताने 55 लाख रुपये मुद्दल आणि तब्बल 60 लाख 41 हजार रुपये व्याजापोटी दिले, तरीही सावकारांची लालसा संपली नाही. असे फिर्यादीत म्हटले आहे. व्याज वसुलीच्या नावाखाली आरोपींनी पीडिताच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या 12 जुन्या चारचाकी गाड्या जबरदस्तीने पळवून नेल्या. त्याला मारहाण करून जबरदस्तीने वेगवेगळ्या ठिकाणी नेले. डिसेंबर 2025 मध्ये आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून, पीडित व त्याच्या भावाच्या नावावरील कोरेगाव मूळ येथील 3 गुंठे जमीन जबरदस्तीने दीपाली साळुंखे यांच्या नावावर करून घेतली, असा गंभीर आरोप आहे. सततच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक छळाने महादेव जरांडे हे कोलमडले. दरम्यान, 26 जानेवारी रोजी त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळीच उपचार मिळाल्याने जीव वाचला आहे.