प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत पराभूत झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकाने तरुण तसेच त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी गणेश शिवाजी लडकत (५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदे, प्रज्ञा लडकत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महापालिकेच्या भवानी पेठ-कासेवाडी प्रभागातून गणेश लडकत यांचे चुलतभाऊ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप लडकत पराभूत झाले. तक्रारदाराच्या कुटुंबाने लडकत यांच्याविरुद्ध प्रचार केल्याने त्यांचा पराभव झाला, असे वाटल्याने आरोपी शुक्रवारी गणेश लडकत यांच्या घरात शिरले. लडकत आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन धमकी दिली, असे लडकत यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.