पुणे – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेसह दोघांनी आत्महत्या केली. लोहगाव परिसरातील “सीआयएसएफ’च्या वसाहतीत ही घटना घडली असून आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.
अस्मिता दास (मूळ रा. ओडिसा) आणि संजय कुमार (मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी आत्महत्या केलेल्या जवानांची नावे आहेत. अस्मिता दास आणि संजय कुमार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नियुक्तीस होते. दोघांनी त्यांच्या वसाहतीतील वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दोघांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेविषयी कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पथकाकडे लोहगाव विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.