प्रभात वृत्तसेवा पुणे – फुरसुंगीत पुरोहित स्वीट मार्टमधील कर्मचार् यांशी वाद घालून दुकानाची बदनामी करणारा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकत एका कथित पत्रकाराने एक लाखाची खंडणी मागितली आहे. याप्रकरणी पत्रकारासह दोघांवर फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.राहुल मच्छिंद्र हरपळे (रा. फुरसुंगी), माऊली चव्हाण (रा. फुरसुंगी) आणि अन्य यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खिमसिंह ओमसिंह राजपुरोहित (वय ४२, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. फिर्यादीनुसार दोघेजण दुकानात आले. त्यांनी तुमच्या काजू मसाल्यामध्ये आळ्या निघाल्या असे सांगून मॅनेजरशी वाद घातला. व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ही चूक दुकानाची असल्याचे कबूल करावे अशा शब्दात धमकावले. सायंकाळी राहुल हरपळे दुकानात आला आणि स्वत:ला यूट्यूब चॅनेलचा पत्रकार असल्याचे सांगत काजू मसाल्यातील आळ्यांचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकल्याची धमकी दिली. बदनामी टाळायची असेल तर ५० हजार द्यावे, अशी मागणी त्याने केली. फिर्यादींनी व्हिडिओ खरा नसल्याचे सांगत त्याला विरोध केल्यावर हरपळे संतापून निघून गेला. यानंतरही हरपळेने व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याचा दावा करत तो दीड लाख लोकांनी पाहिला असून दुकान बंद पडेल, अशी धमकी दिली. व्हिडिओ डिलिट करण्यासाठी एक लाख मागितले. पोलिसांकडे गेले तर मार्केटमध्ये फिरताना अडचणीत आणू, सांभाळून राहा, असेही बजावले. फिर्यादींनी पोलिसांत फिर्याद नोंदवल्यावर हरपळेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.