Pune Crime: शस्त्राचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटणारा चोर अटकेत, फुरसुंगी परिसरात घडली होती घटना

पुणे – ट्रक चालकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील रोकड लुटल्याची घटना सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात घडली. याप्रकरणी एका चोरट्याला अटक करण्यात आली. ऋषीकेश संतोष मोटे (वय १९, रा. खुटवड चौक, फुरसुंगी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याबरोबर असलेल्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रकचालक प्रदीप भौमिक (वय ४०, रा.मालदा, पश्चिम बंगाल) याने यासंदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भौमिक फुरसुंगी परिसरात एका कंपनीच्या गोदामात माल घेऊन आला होता. त्याने कंपनीच्या आवारात ट्रक लावला होता. दोन दिवसांपूर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास मोटे आणि त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार कंपनीच्या गोदामात शिरले. त्यांनी ट्रकमध्ये झोपलेल्या भौमिकला कोयत्याचा धाक दाखवून खिशातील ५०० रुपये काढून घेतले.
भौमिकने आरडाओरडा केला. मोटे आणि साथीदार पसार झाले. या घटनेची माहिती भौमिकने पोलिसांना दिली. पोलिसांनी मोटेला ताब्यात घेतले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.





