प्रभात वृत्तसेवा पुणे – मंगलकार्यालयात विवाहावेळी गर्दी पाहून महिला अथवा नातेवाईकांचे दागिने, रोकड लाबंविण्याच्या घटना वाढल्या आहेत. बाणेर येथील मंगल कार्यालयातून चोरट्यांनी रोकड, दागिने असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराच्या मुलीचा विवाह समारंभ २५ नोव्हेंबर राेजी बाणेर परिसरातील एका मंगल कार्यालयात होता. त्यांनी एका टेबलवर पिशवी ठेवली. पिशवीत सोन्याचे दागिने, एक लाख ३० हजारांची रोकड, मोबाइल संच असा ऐवज होता. चोरट्यांनी लक्ष नसल्याची संधी साधून पिशवी चोरली. पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. मंगल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करत आहेत.विवाह समारंभातून दागिने चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. पंधरा दिवसांपूर्वी लोणी काळभोर परिसरातील एका मंगल कार्यालयातून चोरट्यांनी दागिने, रोकड असलेली पिशवी लांबविली होती. पीएमपीत एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. याबाबत महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला विश्रंतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. त्या विश्रांतवाडी भागातून धानोरीकडे निघाल्या होत्या. विश्रांतवाडीत बसमध्ये प्रवेश करतना चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन लांबविली. डेअरीतून रोकड लांबविली डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील ९२ हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना धायरीत घडली. याबाबत एका तरुणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची धायरीतील उंबऱ्या गणपती चौकात डेअरी आहे. चोरट्यांनी २६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री डेअरीचे कुलूप तोडले. गल्ल्यातील रोकड लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस कर्मचारी मोरे तपास करत आहेत. मोबाइल हिसकावला पादचारी तरुणाला धमकावून त्याच्याकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना स्वारगेट भागात घडली. याबाबत तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार शुक्रवारी (२८ सप्टेंबर) सकाळी शंकरशेठ रस्त्यावरुन निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी तरुणाला धमकावले. त्याच्या खिशातील ५० हजारांचा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला.