पुणेः रात्रीच्यावेळी एमजी रस्त्यावरील कपड्यांची दुकाने फोडून चोरी करणाऱ्या चोरट्याला लष्कर पोलिसांनी पकडले. निर्मल सोनार (वय.18,रा.नेपाळ) असे त्याचे नाव आहे. यावेळी त्याच्या तिघा विधीसंघर्षीत साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोनार याच्याकडून गुन्ह्यात वापरेल्या दोन दुचाकी, चोरीचा लॅपाटॉप, कटावणी, चोरी केलेले कपडे असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कॅम्प परिसरातील एमजी रस्त्यावरील एका दुकानातून चोरट्यांनी कपड्यांची चोरी केली होती. याप्रकरणी, लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास करत असताना, तांत्रिकविश्र्लेषाद्वारे सोनार याला ताब्यात घेतले. सोनार अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चोरी करत असल्याचे पुढे आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषकुमार दिघावकर, गुन्हे निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल घाडगे, कर्मचारी महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, प्रविण गायकवाड यांच्या पथकाने केली.