प्रभात वृत्तसेवा पुणे – खराडी परिसरात मंगळवारी सायंकाळी एका बांधकाम साइटवर काही तरुणांनी येऊन सुरक्षा रक्षकांना धमकावत ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.राजू तुकाराम अस्वले (२७), विशाल रमेश भादवे (२५), सुनील रवींद्र पाटील (२५), सनी रवींद्र सोनवणे (२२), हिमेश सुभाष मोरे (१८), आकाश संजय मोरे (२४), अंकुश अशोक अडसुल (२८), पप्पू ऊर्फ अभिषेक मिसाल व दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इव्हॉन खराडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सर्व्हे नं. ४२, खराडी येथील साइटवर घडली. सायंकाळी सव्वापाच वाजता सुरक्षा रक्षक रिंटू सरकार गेटवर ड्युटीवर असताना, ५ दुचाकीवरून आलेल्या १० जणांनी येथे काम सुरू करायचे असेल, तर आधी ५ लाख रुपये द्यावे लागतील. रक्षकाने विरोध करताच एका तरुणाने त्याचा हात पकडून धमकी दिली. जर मालकाने पैसे दिले नाहीत, तर साइटचे कंपाउंड फोडून टाकू आणि त्यालाही जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत शिवीगाळ केली व परिसरातील लोकांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. काही पादचाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घाबरून पळ काढला. घटनेची माहिती कंपनीचे फील्ड ऑफिसर विशाल आंधळे यांनी सुरक्षा प्रमुख (सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल) सारंग काश पांडे यांना दिली. पांडे यांनी लगेच कंपनीच्या कायदेशीर विभागाशी संपर्क साधून खराडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारकर्त्यांकडून मिळालेल्या मोबाइल फोटोच्या आधारे आरोपींची ओळख पटवून चौघांना अटक केली. तक्रारकर्त्यांनी सांगितले की, खंडणी मागणारा मुख्य तरुण राजू अस्वले होता. उपनिरीक्षक राहुल कोळपे तपास करत आहेत.