पुणे : शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी निलेश घारे यांच्या मोटारीवर सोमवारी (दि. १९ मे) रात्री वारजे भागातील गणपती माथा परिसरात पिस्तूलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने मोटारीत कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. निलेश राजेंद्र घारे (वय ३७, रा. स्वरा हाईट्स, न्यू अहिरेगाव, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घारे हे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी असून, त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी जिवाला धोका असल्याचा तक्रार अर्ज पुणे ग्रामीण आणि वारजे पोलिसांना दिला होता. त्यांचा एका व्यक्तीशी वादही झाला होता. सोमवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास घारे हे त्यांच्या गणपती माथा परिसरातील कार्यालयात थांबले होते. त्यांनी कार कार्यालयासमोर उभी केली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोराने कारच्या मागील काचेवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून घारे कार्यालयातून बाहेर आले आणि त्यांनी तातडीने वारजे पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण आणि हल्लेखोरांचा हेतू याबाबत अधिक तपास सुरू आहे.