Pune Crime – पीएमपीतून प्रवास करणाऱ्या युवतीशी अश्लील कृत्य करणाऱ्या वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरिफ जलील शेख ( ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे त्याचे नाव आहे. युवतीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडित युवती अल्पवयीन आहे. ती २८ मार्च रोजी कात्रजहून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा पीएमपी वाहक (कंडक्टर) आहे. प्रवासादरम्यान त्याने युवतीला मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतर स्पर्श करुन विनयभंग केला. युवतीने आरडाओरडा केला. प्रवाशांनी बस थांबविली. युवतीकडे विचारणा केल्यानंतर वाहकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका ज्येष्ठाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिलेच्या दहा वर्षांच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला. ही बाब तिने आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे तपास करत आहेत.