प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या काही वर्षांत शहरातील खून आणि गोळीबारात वापरलेली शस्त्रे उमरटीमधूनच आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शरद मोहोळ ते वनराज आंदेकर हत्याकांडासह शहरातील गंभीर गुन्हयांचे पुनर्वलोकन होणार असून, संबंधीत शस्त्रनिर्मात्यांनाही सहआरोपी केले जाईल. राज्यातील गुन्हेगारीला शस्त्रांचा पुरवठा कोठून होतो, हे उघड झाल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात वापरलेली बहुतांश शस्त्रे (गावठी कट्टे) मेक इन यूएसए म्हणजेच उमरटी शिकलगार आर्म्स येथे तयार झाल्याचे निष्पन झाले आहे. उमरटी हे मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्हयातील एका डोंगराळ भागातील गाव आहे. येथून महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यातही शस्त्र पुरवठा केला जातो. ही शस्त्रे जळगाव , धुळे मार्गे महाराष्ट्रात येतात. पुणे पोलिसांनी शनिवारी आंतरराज्य बेकायदा शस्त्रे पुरवणारे रॅकेट उधवस्त केले. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांकडील शस्त्रांवर यूएसए असा शिक्का होता. याचा खोलवर तपास केला असता, उमरटी येथील बेकायदा शस्त्र कारखान्याची माहिती मिळाली. या गावात मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्६ तयार होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तब्बल तीन आठवडे तयारी करुन छापा टाकला. छाप्याच्या वेळी गावाने एकत्र येऊन पोलीस पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शीघ्र कृती दल, अश्रुधूर पथक आणि मध्य प्रदेश एटीएसचे पथक असल्याने काही गडबड झाली नाही. बेकायदा शस्त्रांचा बालेकिल्ला उमरटी गाव मागील दोन-चार वर्षापासून बेकायदा शस्त्रनिर्मीतीसाठी चर्चेत आहे. येथे विशीष्ट प्रकारचे बॅरल, पाईप, मँगझीन स्प्रींग आदी साहित्य आणले जात होते. या साहित्यापासून ऑर्डर मिळेल तशी शस्त्रांची निर्मिती, जुळवणी केली जात होती. लेथ मशिनवर तसेच हाताने घासून शस्त्र बनवले जात होते. ऑर्डर देताच पाच ते सहा तासांत शस्त्र तयार होऊन हातात मिळत होते. यामुळे महाराष्ट्रातील शस्त्र तस्करांच्या आणि गुन्हेगारांच्या वाऱ्या उमरटीत वाढल्या होत्या. हे गाव पुणे शहरापासून ५०० किलोमीटरवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहे. येथे घरोघरी शस्त्र निर्मितीचे छोटे-छोटे कारखाने आहेत. इंटरनेटवरुन ऑर्डर कारागृहात आलेल्या तरुण गुन्हेगारांना तेथील इतर गुन्हेगारांकडून उमरटी गावातील शस्त्र निर्मीतीची माहिती मिळते. यानंतर ते ओळखीतून एक-दोनचा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. ते कोणत्याही कारवाईत सापडले नाही तरी उमरटी गावात त्यांना सहज प्रवेश मिळतो. यानंतर ते इंटरनेट कॉलिंगव्दारे शस्त्रांची ऑर्डर देतात. शस्त्र आणण्यासाठी ते दुचाकीवरुन जातात. जेणेकरुन रस्त्यात नाकाबंदी असेल तर मार्ग बदलून सहज पळ काढता येतो.