Pune Crime – भारती विद्यापीठ परिसरात कौटुंबिक वादातून सुनेने ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करुन खून केला. या प्रकरणी ६० वर्षीय सुनेला पोलिसांनी अटक केली. सुमन अण्णासाहेब शिंदे (वय ८२, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक, भारती विद्यापीठ परिसर) असे खून झालेल्या सासूचे नाव आहे. या प्रकरणी अनुपमा संजय शिंदे (वय ६०) यांना अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी भारती विद्यापीठ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे पती संजय, विवाहित मुलगा, सून आणि सासू सुमन हे एकत्र राहतात. अनुपमा यांचे पती सेवानिवृत्त आहेत. विवाहित मुलगा नोकरी करतो. अनुपमा यांचा किरकोळ कारणावरुन सासूबरोबर वाद व्हायचा. मंगळवारी (१२ मे) अनुपमा आणि सुमन घरात होत्या. दुपारी दीडला वाद झाल्यावर सुनेने सासूवर सुरीने वार केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला कोडून घेतले. ही माहिती कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली. शयनगृहात सासू सुमन या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. चौकशीत कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सुमन यांना ससून रुग्णालयात दाखल केले. अनुपमा यांची चौकशी केली. यावेळी त्यांनी खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी त्यांना अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून परदेशी तपास करत आहेत.