Pune Crime : ‘दिरहम’ चलनाऐवजी पेपरात गुंडाळून दिले ‘रिन साबण’; फसवणूक करणारी टोळी ‘जेरबंद’

पुणे – युनायटेड अरब इमिरेटस या देशाचे ‘दिरहम’ या चलनाच्या नोटा स्वस्तात देण्याच्या बदल्यात लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सध्या चार गुन्हे उघडकीस आले असून त्यांनी 12 ते 14 जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या टोळीने पुण्यात आजवर नागरिकांना 30 ते 35 लाखाचा गंडा घातला असल्याची शक्यता आहे. यातील अनेक तक्रारदार अद्याप पुढे आले नाहीत. फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास संपर्क साधावा असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.
मोहमद उबईदुल्ला मुदसेर शेख (30 ), मोहम्मद कामरान खान (28 ),रिदोईरहीम खान (23 ), उस्मान मुतलिफ अली(27) , बाबु फुलमिया मुल्ला (32,सर्व रा. हडपसर) आणि पाखी सुबान मलीक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी कोंढव्यात राहणाऱ्या एका 40 वर्षांच्या तरुणाने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली होती. हा प्रकार बिबवेवाडीतील अप्पर बस डेपोच्या बाजूला सप्टेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजता घडला होता. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना भारतीय नोटांच्या बदल्यात युनायटेड अरब अमिरेटस या देशाचे दिरहम या नोटा देण्याचा बहाणा केला. त्यांना पैसे घेऊन अप्पर बस डेपोचे बाजूला बोलावले. त्यांना रिन साबणांना इंग्रजी व मराठी वर्तमानपत्र गुंडाळून एका हातरुमालाने बांधलेला गठ्ठा असलेली लाल रंगाची नायलॉनची पिशवी दिली.
फिर्यादी यांनी ही पिशवी उघडून पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या हातातून 60 हजार रुपये असलेली प्लास्टिकची पिशवी घेऊन हिसकावून त्यांना हाताने धक्का देऊन जमिनीवर पाडून पळून गेले होते.
या टोळीने शहरात अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. अप्पर बस डेपो येथे घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणयाच्या आधारे बिबवेवाडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगावकर तपास करीत आहेत.





