पुणे – पुणे शहरातील बड्या गुन्हेगारी टोळ्यांचा अंमल संपवण्यासाठी आता पोलिसांनी नवा डाव टाकला आहे. मकोका आणि कडक कलमांचा परिणाम कमी होत नसल्याने, शहर पोलिसांनी थेट या टोळ्यांच्या आर्थिक स्त्रोतांवर गदा आणण्याचे काम हाती घेतले आहे. गुन्हेगारीतून मिळणारा पैसा आणि त्यावर उभी राहिलेली “नंबरकारी साम्राज्ये” आता तपासाच्या विळख्यात येणार आहेत. या टोळ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट होणार असून, त्यासाठी स्वतंत्र तज्ञ लेखापरीक्षकांची टीम नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचे उद्दिष्ट एकच असेल ते म्हणजे “सुपारीसाठी नव्हे तर बिर्याणीसाठीही पैसा ठेवणार नाही . आंदेकरच्या आर्थिक साम्राज्यावर पहिला घाव या मोहिमेची सुरुवात बंडू आंदेकर टोळीच्या आर्थिक व्यवहारांच्या तपासातून झाली आहे. आंदेकर टोळीच्या वित्तपुरवठ्याचे धागेदोरे शोधल्यानंतर पोलिसांनी निलेश घायवळ आणि गजा मारणे यांच्या संपत्तीवरही नजर ठेवली आहे. आंदेकर-कोमकर टोळी युद्धात आयुष कोमकरचा खून झाल्यानंतर पोलिसांनी टोळ्यांच्या आर्थिक स्रोतांना हात घालण्याचा निर्णय घेतला. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या टोळ्यांकडे लाखो रुपये बेकायदेशीर मार्गाने येत असल्याने, ते मोठ्या वकिलांना ठेवून जामीन मिळवतात आणि कारागृहातूनच टोळीचे संचालन करतात. नंबरकारींची कुंडली” तयार होणार – मोठ्या टोळ्यांसाठी काम करणाऱ्या “नंबरकारी” तरुणांची दुसरी साखळी आता पोलिसांच्या रडारवर आहे. या साखळीत अल्पवयीन मुलांपासून तरुण गुन्हेगारांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. त्यांच्यावरील व्यक्तिगत फाइल्स व कुंडली तयार करून त्यांच्यावर सतत नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, शहरात रात्रपाळीतील गस्त वाढवण्यात आली असून, मागील दोन दिवसांत कोयता बाळगणाऱ्या १२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सहा कोयते जप्त करून, त्यांच्याविरुद्ध आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. “अंडा भुर्जी गाड्यांवर” पोलिसांचा रडार – शहरातील काही उपनगरांमध्ये अंडा भुर्जी गाड्या रात्रभर सुरु असतात. येथे जमणाऱ्या तरुणांमध्ये मद्यपान आणि वादांची मालिका सुरू राहते. या ठिकाणी गुन्हेगारी घटनांची नोंद वाढल्याने, पोलिसांनी रात्री अकरानंतर अशा गाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अवैध दारू विक्रेत्यांवरही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. शहर पोलिसांची उच्चस्तरीय बैठक – मागील काही दिवसांत वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त(गुन्हे) निखील पिंगळे यांनी दिली. -टोळ्यांच्या संपत्तीचे फॉरेन्सिक ऑडिट -नंबरकारींचे डिजिटल ट्रॅकिंग आणि प्रोफाइलिंग -रात्रगस्त वाढविणे आणि शस्त्र तपासणी मोहीम -गुन्हेगारीतून कमावलेल्या मालमत्तेवर कायदेशीर जप्तीची प्रक्रिया