प्रभात वृत्तसेवा पुणे – खरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीत आलेल्या महिलांनी दागिने चोरल्याची घटना बंडगार्डन रस्ता, कोंढवा भागात घडली याप्रकरणी कोेरेगाव पार्क, कोढवा पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे चोरी करणाऱ्या महिलांनी बुरखा घातल्याचे चित्रीकरणात आढळले.बंडगार्डनच्या पेढीतून महिलांनी खरेदीच्या बहाण्याने पावणेपाच लाखांचे सोन्याचे कडे चोरून नेले. पेढीतील रोखपालाने फिर्याद दिली आहे. पेढीत १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोन महिला आल्या. त्यांनी बुरख्याने चेहरा झाकला होता. त्यांनी कर्मचाऱ्यांना दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतविले. महिलांनी चार लाख ७४ हजारांचे सोन्याचे कडे चोरून नेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सराफी पेढीतील चित्रीकरण तपासले आहे. पसार महिलांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण तपास करत आहेत.कोंढवामधील पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या महिलांनी २० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. सराफ व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार,कोंढवा खुद्र भागात विठ्ठल मंदिराजवळ ही सराफी पेढी आहे. २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन महिला खरेदीच्या बहाण्याने आल्या. त्यांनी व्यावसायिकाला बोलण्यात गुंतविले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून २० हजारांचे दागिने चोरुन नेले. पसार झालेल्या महिलांंनी बुरख्याने चेहरा झाकल्याचे सराफ व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.