पुणे – स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाने खोलीमध्ये किटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हि घटना शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नवी पेठेत घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
अमर रामचंद्र मोहिते (वय 33, रा. विठ्ठल मंदिरामागे, नवी पेठ, मुळ रा. जत, सांगली ) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंडलीक कायगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर हा 2010 पासून केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा अभ्यास करीत होता. “एमपीएससी’च्या परीक्षेत तो उत्तीर्णही झाला होता, मात्र त्याने नोकरी स्विकारली नव्हती. दरम्यान, पाच ते सहा महिन्यांपुर्वीच त्याचे लग्न झाले होते. त्याचा भाऊ दत्तात्रय मोहिते हे पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
अमर त्याच्या मित्रांसमवेत नवी पेठेतील विठ्ठल मंदिरामागे असलेल्या एका वसतीगृहामध्ये राहात होता. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत तो खोलीमध्ये त्याच्या मित्रांसमवेत गप्पा मारत होता. त्याचे मित्र गेले.
दरम्यान, रात्री तो एकटाच खोलीमध्ये होता. सकाळी त्याच्या खोलीतील मित्र आला, त्याने दरवाजा वाजविला, तरीही अमरने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मित्राने अमरचा भाऊ दत्तात्रय मोहिते यांना फोन केला. त्यांनीही अमरच्या मोबाईलवर फोन लावला, परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर विश्रामबाग पोलिस शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी झोपलेल्या अवस्थेत पडला होता. त्याच्या खोलीत किटकनाशकाची बाटली पडलेली होती.
दरम्यान, यापूर्वीही एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या स्वप्निल लोणकर, मल्हारी नामदेव बारवकर या विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.