पुणे – वाघोलीतील उबाळे नगर परिसरात रविवारी पहाटे धक्कादायक घटना घडली. रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या बादल शेख (वय २४, रा. खराडी) याचा त्याच्याच तीन साथीदारांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कृष्णा लॉजसमोर पहाटे सुमारास ३.३० वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, रात्री उशिरा खराडी परिसरात बादल शेख व त्याचे तीन साथीदार यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यानंतर चौघेही एका दुचाकीवरून वाघोलीतील उबाळे नगर परिसरात आले. त्यांनी कृष्णा लॉज येथे रूम घेण्याबाबत चौकशी केली. त्याचवेळी पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि इतर तिघांनी बादल शेखवर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी त्याच्यावर वार केल्यानंतर डोक्यात दगड घालून त्याची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मृत बादल शेख आणि हल्लेखोर हे सर्वच रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हत्येचं कारण आणि आरोपींचा शोध सुरू असून, हद्दीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे