पुणे : विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धानोरी येथील मुंजाबा वस्ती, लेन नंबर ५ येथे एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने वाहनांच्या काचा फोडल्याची घटना बुधवार सकाळी घडली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. सदर मुलाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक ( १६) असे या अल्पवयीन मुलाचे नाव असून, तो ६.३० वाजण्याच्या सुमारास धानोरी येथून जात असताना काही स्थानिक युवकांनी त्याच्याकडे पाहिले. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या अभिषेकने लाकडी दांडक्याच्या सहाय्याने तेथे उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या. त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण केली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. प्रथमिक तपासात मुलाचा कोणताही पूर्वगुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास सुरू आहे