पुणे – बँकॉकहून विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाकडून सहा कोटी रुपये किमतीचा सहा किलो १४४ ग्रॅम गांजा पुणे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या या प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अतुल सुशील हिवाळे (वय ४३) असे अटक आरोपीचे नाव आहे. नामांकित खासगी कंपनीच्या बँकॉक-पुणे विमानाने हा प्रवासी मंगळवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला. त्याच्या संशयास्पद वर्तनावरून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची कसून झडती घेतली. त्या वेळी त्याच्या बॅगेत बारा सीलबंद पाकिटात हिरव्या रंगाचा तीव्र गंधयुक्त सुकलेला पदार्थ सापडला. प्राथमिक चाचणीत तो ‘हायड्रोपोनिक वीड’ म्हणजे उच्च प्रतीचा गांजा असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेला गांजा उच्च प्रतीचा असून, काळ्या बाजारात या महागड्या गांजाला मोठी मागणी आहे. विमानाने गांजाची तस्करी – बँकॉकहून पुण्यात विमानाने आलेल्या प्रवाशाकडून गांजा पकडण्यात आल्याची ही गेल्या पंधरवड्यातील दुसरी घटना आहे. एका प्रवाशाकडे १०.४७ किलो वजनाचा ‘हायड्रोपोनिक वीड’ हा उच्च प्रतीचा गांजा सापडला. काळ्या बाजारात या गांजाची किंमत अंदाजे साडेदहा कोटी रुपये आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय टोळी अमली पदार्थांची तस्करी करत आहे का, यामागचा सूत्रधार कोण आहे, याबाबत तपास सुरू आहे.