पुणे – नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल ६ हजार ९०० प्रतिबंधित गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी स्वारगेट येथील जेधे चौक परिसरात करण्यात आली. समीर हमीद शेख (४० , कोंढवा ) आणि सुनिल गजानन शर्मा (३४,रा.कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. समीरवर अगोदर एक फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना गुंगीकारक औषधे विक्रीसाठी दोन व्यक्ती दुचाकीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून संशयित दुचाकीला अडवले. तपासादरम्यान त्यांच्या दुचाकी डिक्कीत गुंगीकारक औषधांचे पाकीट आढळून आले. पुढील चौकशीत त्यांच्या कोंढवा परिसरातील घरात अधिक साठा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी घरावर छापा टाकत नेट्रोझेपाम, नित्झासेन १०, अल्प्राझोलाम ०.५ निट्राफास्ट अशा प्रकारच्या गोळ्यांसह एकूण ६ हजार ९०० गोळ्या ताब्यात घेतल्या. अटकेत घेतलेले आरोपी समीर हमीद शेख ( ४०, रा. साईबाबा नगर, कोंढवा) आणि सुनील गजानन शर्मा ( ३४, रा. साईनगर, कोंढवा) हे दोघेही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवानगी न घेता या गोळ्यांची विक्री करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या गोळ्या मुख्यतः कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प आणि येरवडा परिसरात नशेच्या वापरासाठी विकल्या जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आला असून आरोपींवर एनडीपीएस कायद्याच्या कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषिकेश रावले आणि सह पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक, शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विधिन शुभम केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे, मयुर काळे, युवराज नाइकरे यांच्या पथकाने केली आहे. जप्त केलेल्या गोळ्यांचा नशेसाठी वापर जप्त करण्यात आलेल्या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात होता. या गोळ्या डॉक्टर काही आजारांमध्ये झोप न येणाऱ्या रुग्णांसाठी किंवा रुग्णांना पुरेशी झोप मिळून आराम मिळण्यासाठी देतात. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय विकण्यास बंदी आहे. या गोळ्यांमध्ये अंमली पदार्थाचा काहीसा अंश असल्याने त्याची बेकायदा विक्री ही अंमली पदार्थ कायद्यानूसार गुन्हा आहे.