प्रभात वृत्तसेवा पुणे – टिंगरेनगर येथील विद्यानगर गल्ली क्रमांक ८ येथे बॉम्बमध्ये वापरल्या जाणार्या जिलेटिन कांड्या आणि डिनोनेटरचा मोठा साठा आढळला. यामध्ये १३८ जिलेटिन कांड्या आणि १३५ डिनोनेटरचा समावेश आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.राहुल वाजे आणि किसन दंडवते (दोघेही रा. शिरूर) अशी त्यांची नावे आहे. फिर्यादीनुसार विद्यानगरमध्ये सफाई सेविकेला मोकळ्या प्लॉटलगतच्या पत्र्याच्या गेटजवळ एक पोते दिसले. संशय आल्याने तिने त्वरित पोलिसांना माहिती दिली. विश्रांतवाडी पोलिसांनी तपासणी केल्यावर पोत्यामध्ये जिलेटिन कांड्या आणि डिनोनेटर वायर आढळल्या. हे साहित्य सर्वसाधारणपणे खडक फोडण्यासाठी वापरले जाते. प्राथमिक चौकशीत हा साठा एका बांधकाम व्यावसायिकाचा असल्याचे समोर आले आहे. वाजे आणि दंडवते यांच्याकडे परवाना आहे. मात्र, नागरिकांच्या जिवीतास धोका होईल, अशा ठिकाणी साहित्य ठेवून निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांनी सांगितले.