प्रभात वृत्तसेवा पुणे – हडपसरमधील सय्यदनगर, काळेपडळ परिसरात दहशत माजविणारा गुंड रिजवान उर्फ टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पठाण याच्याविरुद्ध आतापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, खंडणी असे गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे दाखल झाले आहेत. पठाण आणि साथीदारांनी हडपसरमधील सय्यदनगर भागात असलेल्या एका जागेचा बेकायदा ताबा घेऊन तेथे पत्र्याचे शेड उभे केले. बेकायदा ताबा घेतलेली जागा पठाण आणि साथीदारांनी एकाला भाडेतत्त्वावर वापरण्यास दिली. ही बाब तक्रारदाराच्या लक्षात आल्यानंतर त्याने पठाणसह साथीदारांना जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले. तेव्हा जागा मोकळी करून देण्यासाठी पठाणने २५ लाख रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी मकोका कारवाईचा प्रस्ताव काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविला. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजुरी दिली.हडपसरमधील सय्यदनगर परिसरात पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने यापूर्वी एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. पठाणने एका कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या. पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला.