प्रभात वृत्तसेवा पुणे – गणेश विसर्जन सोहळ्यात भाविकांकडील सोनसाखळी लांबवून पसार झालेल्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात गुन्हे उघडकीस आले असून, सात लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.परशा ऊर्फ प्रशांत शिवराम शिंदे (२२, रा. खुळेवाडी, नगर रस्ता) असे आरोपीचे नाव आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात ६ सप्टेंबर रोजी बेलबाग चौकात भाविकांकडील सोनसाखळी लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. बेलबाग चौकातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर पोलीस कर्मचारी अर्जुन थोरात यांनी संशयित चोरटा शिंदे याला हेरले होते. त्यानंतर पोलीस तपासात बेलबाग चौकात भाविकांकडील सोनसाखळी लांबविण्याचे गुन्हे पराशा शिंदे याने केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल भोसले यांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर आणि पथकाने शिंदे याला खुळेवाडी परिसरात सापळा लावून पकडले. शिंंदे याच्याकडून सात लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. शिंदेने दागिने शेजारी राहणाऱ्या एकाकडे ठेवले होते. शिंदे याने विसर्जन सोहळ्यात भाविकांकडील सात लाखांचे दागिने लांबविले असून, विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झालेले सात गुन्हे उघडकीस आले आहेत. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, निरीक्षक अरुण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.