पुणे – खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हयातील फरार आरोपीस चार वर्षानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. भाच्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने एका तरुणावर 2018 मध्ये वार केले होते. यावेळी त्याच्यासोबत इतर सहा साथीदार होते. त्यातील चार अल्पवयीन मुले होते. यासर्वांना घटना घडल्यावर ताब्यात घेण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
संतोष राजेंद्र जगताप (29 धंदा-ड्रायव्हर रा.कात्रज नवीन वसाहत गणपती मंदिरामागे, सध्या ता.माढा जि.सोलापुर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी संतोष जगताप हा 2018 मध्ये कोणताही कामधंदा करत नव्हता. फरार झालेल्या कालावधीत तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्याच्या भाच्याला 2018 साली फिर्यादी असलेल्या तरुणाने मारहाण केली होती.
याचा बदला घेण्यासाठी संतोष याने त्याच्या साथीदारासह फिर्यादीला किनारा हॉटेलमागे गाठले होते. तेथे सर्वांनी त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी इतर आरोपींची धरपकड केली होती. मात्र मुख्य आरोपी तेव्हापासून पोलिसांना गुंगारा देत होता.
दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना मिळाली की, गुन्हयातील पाहिजे आरोपी संतोष जगताप हा कात्रज स्मशानभुमीचे समोर उभा आहे. त्यानूसार सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड व त्यांचे पथकाने आरोपीस पकडले. तो त्याचे सोलापूर जिल्हयातील माढा येथे पळून गेला होता. तेथे तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
ही कामगिरी उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, विजय पुराणिक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे, तपास पथकांचे अंमलदार रविंद्र चिप्पा, गणेश भोसले ,सचिन पवार, हर्षल शिंदे यांच्या पथकाने केली.