पुणे – तु मला काय म्हणाला होतास, त्या दिवशी’ असा जाब विचारत एका तरुणाच्या डोक्यात दारुची बॉटल फोडण्यात आली. ही भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यासही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना खडकी येथील बुध्द विहार चाळीत घडली. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तीन ते चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी राहुल पाल (28,रा.खडकी) हा काम संपवून घरी पायी निघाला होता. यावेळी त्याचा रस्ता अडवून एका आरोपीने त्याला ” तु मला त्या दिवशी काय म्हणाला होतास? ‘ असा जाब विचारला. यानंतर हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्याच्या इतर साथीदारांनीही हाताने मारहाण केली.
यानंतर राहुलने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या डोक्यात दारुची रिकामी बाटली फोडण्यात आली. राहुल जखमी होऊन खाली पडल्यानंतर एक जण भांडणे सोडविण्यासाठी मध्ये पडला. त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी देत लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील करत आहेत.