Pune Crime | विनयभंगप्रकरणी गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध गुन्हा

पुणे, दि. २६ (प्रतिनिधी)- रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या आरोपीच्या नातेवाईकासोबत दारुपार्टीत दोन मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हे शाखेतील निलंबित संबंधित उपनिरीक्षकावर आता विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २१ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
माने हे गुन्हे शाखेच्या युनिट चार येथे नेमणुकीस होते. मागील आठवड्यात (दि. १७) चतुःशृंगी परिसरात गुन्हे शाखेने रॅमिडेसिव्हीर इंजेक्शन विक्री करण्यास आलेल्या दोन भावडांना अटक केली. तर त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केले होते. त्यानंतर उपनिरीक्षक माने यांची आरोपींच्या नातेवाईक असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. त्यानंतर माने पार्टीसाठी गेले होते.
मद्यपान केल्यानंतर मानेनी एका अल्पवयीन मुलीसह दोन मुलींची छेडछाड केली. याप्रकरणी चौकशीनंतर माने यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. आता मुलींनी तक्रार दिल्यानंतर मानेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





