प्रभात वृत्तसेवा थेऊर – परिसरात घरासमोर लघवी करण्यास हटकले म्हणून एका परप्रांतीय शिक्षकाने शिवीगाळ करत हाताने व ठोश्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शिवाजी कांतीलाल काळभोर (वय 43, रा. कुंजीरवाडी, थेऊर फाटा, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद मोहन कुलकर्णी (वय 38, रा. घर क्र. 79, सुहाग कॉलनी, विजापूर, कर्नाटक) यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना 28 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11 वाजता कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घडली. शेतातील गव्हाला पाणी देऊन काळभोर हे घरी परतत असताना त्यांच्या घरासमोर आनंद कुलकर्णी लघवी करताना दिसले. त्यांनी हटकले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर आरोपीने हाताने व ठोश्याने मारहाण केली. दरम्यान, पाठीमागून जोराचा धक्का दिल्याने काळभोर खाली पडले आणि त्यांच्या कपाळाला, नाकास, ओठास दुखापत झाली. तसेच तोंडातील वरील बाजूचा एक दात पडला, डाव्या गुडघ्याला व उजव्या हाताच्या बोटाला जखमा झाल्या.घटनेनंतर काळभोर यांनी 112 वर फोन करून पोलिसांना मदतीसाठी संपर्क साधला. पोलिसांनी दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. जखमी काळभोर यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी औपचारिक तक्रार नोंदवली.या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी शिंदे करत आहेत.