पुणे – सहकारनगर पोलिसांनी बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. त्यांनी पाच आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या स्वरुपातील १० लाख ३५ हजार रुपये मूल्याच्या बनावट नोटा हस्तगत केल्या. टोळीतील इतर आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक गाझियाबाद येथे गेले आहे.
नीलेश हिरानंद विरकर (३३, रा. चिंचवड), शाहीद कुरेशी (२५), सैफान पटेल (२६), अफजल शहा ( १९, सर्व रा. नवी मुंबई), शाहफहड ऊर्फ सोनु फिरोज अन्सारी (२२, रा. पालघर) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “सहकारनगर पोलिसांचे पथक गस्तीवर होते. त्यावेळी नीलेश हा गडबडीने स्वारगेटकडे जाताना पोलीस अंमलदार अमोल पवार व महेश मंडलिक यांना दिसला. संशय आल्याने पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. चौकशीवेळी तो पॅंटच्या खिशात काहीतरी लपवताना दिसला. त्यावेळी ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल पोलिसांना आढळले. त्याच्याकडून अशा २५० नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटा त्याने कोपरखैरणे शाहीद, सैफान आणि अफजलकडून मिळवल्या होत्या.
या तिघांना पोलिसांनी अटक केली. तेव्हा चौकशीत आरोपी अंसारचे नाव पुढे आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. या सर्व २ हजार ७० नकली नोटा बाजारात आल्या असत्या तर त्यांची किंमत सुमारे १० लाख ३५ हजार रुपये झाली असती.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक उप-निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे, चंद्रकांत जाधव, बजरंग पवार, अमित पदमाळे, सागर सुतकर, अभिजीत वालगुडे, महेश भगत खंडु शिंदे, योगेश ढोले यांच्या पथकाने केली.