प्रभात वृत्तसेवा पुणे – दुबई आणि टांझानियात अत्यंत स्वस्त दरात स्क्रॅप देण्याचे आमिष दाखवून एका उद्योगपतीची तब्बल ३ कोटी ७९ लाख ७७ हजारांची फसवणूक केली आहे.खडक पोलिसांनी आरोपी भूपेंद्र सिंह उर्फ संजय कुमार राघव याला कोलकाता येथे अटक करून पुण्यात आणले. दुबई–टांझानियाची फेरीरविवार पेठेत राहणारे आणि तांब्याच्या भांड्यांचा व्यवसाय करणारे सुधीर रघुनाथ बारोट यांना व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर स्क्रॅपची गरज होती. डिसेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान त्यांची ओळख आरोपीशी झाली. त्याने मुंबईतील इंडो अर्फी मेटल्स कंपनी एलएलसी आणि सबपर्ला इंटरनॅशनल एलएलपीचे संचालक असल्याचे भासवले. यावेळी त्याचा मुलगा प्रवीरसिंग राघव उपस्थित होता. दोघांनी स्वतःचे दुबईमध्ये ऑफिस आणि टांझानियामध्ये स्क्रॅप फॅक्टरी असल्याचे सांगत स्क्रॅप सप्लायचे आश्वासन दिले. आरोपींनी बारोट यांना आधी दुबई, टांझानियात नेऊन ७५ टन स्क्रॅप दाखवले. हा स्क्रॅप गुजरातमधील मुद्रा बंदरात आणण्याचा करारही झाला.विश्वास बसल्यानंतर बारोट यांच्याकडून आरोपींनी दुबईतील अबुधाबी बँकेच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर न माल पोहोचला, न पैसे परत मिळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुधीर बारोट यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. तपासात आरोपींनी पर्वती दर्शन येथील मिलिंद रविंद्र नाशिककर यांचीही ९० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले. ही रक्कम दुबईतील मशरत बँकेत जमा केली होती. तपासात आरोपीने पंजाब, कोलकाता, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिशासह विविध राज्यांतही अशा पद्धतीने कोट्यवधींची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. पोलीस आता आरोपीचा मुलगा प्रवीरसिंगचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशीकांत चव्हाण यांनी सांगितले.