प्रभात वृत्तसेवा लोणी काळभोर – येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पाषाणकर बाग परिसरात 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा ’एमडी’ ड्रग्ज नावाचा अंमली पदार्थ एकाकडे सापडला असून पोलिसांनी त्याला अटक करून सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लोणी काळभोरमध्ये ड्रग्ज सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.अफसर अहेसान अन्सारी (वय 31, रा. पाषाणकर बाग, लोणी काळभोर) याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन मारूती मुंढे (वय 38) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा पथकाला अफसर अन्सारी सार्वजनिक रस्त्यावर संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 लाख 80 हजार 920 रुपये किंमतीचे 7 ग्रॅम 99 मिलीग्रॅम वजनाचा ’एमडी’ ड्रग्ज व 20 हजारांचा मोबाईल, इलेक्ट्रीक वजनकाटा, पिशवी, चमचा, झिप-लॉक पादर्शक 17 रिकामे पाउच असा सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अफसर अन्सारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर करीत आहेत.