Pune Crime: सोबत बसून दारू प्याली, नंतर डोक्यात दगड घालून मित्राचा खून; आरोपी अटक

पुणे – बाणेर भागात एकाच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेने ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरातून अटक केली. अनैतिक संबंधातून आरोपीने खून केल्याचे तपासात उघडकीस आले.
कृष्णा भीमराव सुरोशे (वय ४०, रा. बालेवाडी गावठाण, मूळ रा. आनंदवाडी, ता. परतूर, जि. परभणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
बाणेर भागातील धनकुडे वस्ती परिसरातील मोकळ्या जागेत नाना विठ्ठल चादर मृतावस्थेत पडला होता. चादर याच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आल्यनंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून तपास सुरू करण्यात आला.
आरोपी सुरोशे आणि चादर मित्र होते. चादरच्या खुनानंतर सुरोशे पसार झाला होता. सुरोशे आणि चादर यांना दारु पिण्याचे व्यसन होते. ७ जून रोजी रात्री चादर आणि त्याचा मित्र सुरोशे यांनी रामदास घनकुडे यांच्या मोकळ्या जागेत दारू प्याली.
दारुच्या नशेत चादर तेथे झोपला. चादर याच्या डोक्यात दगड घालून सुरोशे अंबरनाथला पसार झाला. तांत्रिक तपासात याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. या घटनेशी रामदास धनकुडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले.





