प्रभात वृत्तसेवा पुणे – येरवडा भागातील एका पेट्रोल पंपावर दहशत माजवून कामगारावर शस्त्राने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. कृष्णा प्रभाकर नाईक (२५), अक्षय ऊर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५), अली रफीक शेख (वय २५, तिघे रा. गांधीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.१३ नाेव्हेंबर रोजी येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यावरून आरोपी नाईक, जमदाडे, शेख यांनी पंपावरील कामगारांशी वाद घातला. याशिवाय कर्मचाऱ्यांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून आरोपींनी दहशत माजविली होती. पोलिसांकडे तक्रार दिल्यास पंपावरील कामगारांना जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. याबाबत एका कामगाराने येरवडा पोलिसांत फिर्याद दिली होती. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असताना, ते कल्याणीनगर येथील नदीपात्रात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी शिंदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार यांनी ही कामगिरी केली.