पुणे – बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग-2 मध्ये चालू असलेल्या बांधकामाचा कचरा घरावर पडल्याने झालेल्या भांडणात इंजिनिअरने रागाच्या भरात एका व्यवसायीकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही धक्कदायक घटना सोमवारी( दि.10 ) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
शरद सीताराम पुरी (वय 35, रा.सुख सागर नगर भाग 2 लेन नंबर 5 बिबेवाडी पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपटकर (वय 46, र सुखसागर नगर भाग 2, बिबवेवाडी ) याला अटक केली आहे.
बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी सांगितले, बिबवेवाडीत सुखसागर नगर भाग-2 मध्ये पुरी आणि कपटकर शेजारी शेजारी राहण्यास आहेत. गुन्ह्यात मृत झालेले पुरी हे व्यावसायिक असून कपटकर हा इलेट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नव्हता त्याच्या घरा शेजारीच पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर पडत होता.
कपटकर यांच्या घरावर कचरा पडल्याने झालेल्या भांडणात पुरी यांच्या छातीत कपटकर याने चाकू भोकसला. हा घाव वर्मी लागल्याने पुरी यांचा मृत्यू झाला. सचिन कपटकर हा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर असून मागील चार ते पाच वर्षापासून तो बेरोजगार आहे. यामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली आहे. तर पुरीचा छोटाचा व्यवसाय असून तो कुटूंबासहीत रहात होता.
बेवारस मृतदेह सापडला –
इंदिरानगर चौकातील आम्रपाली पेट्रोल पंपाजवळील राजीव गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील पार्किंगमध्ये एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाईकामी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.