प्रभात वृत्तसेवा नारायणगाव – ऐन दिवाळीच्या पहाटेच्या वेळी घरफोडी करणारा आरोपी विशाल दत्तात्रय तांदळे (रा. मंचर, ता. आंबेगाव) यास पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून तब्बल १४ लाख ३७ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.नारायणगाव येथील विटे मळ्यातील वैभव लक्ष्मी सोसायटीत राहणारे विष्णू भागोजी सांगडे यांच्या घरी दिवाळीत पहाटे ४ ते ६ वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. घरातील महिला ग्रामदैवत श्रीमुक्ताई देवीच्या काकड आरतीला गेल्या असताना, चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून बेडरूममधील लाकडी कपाटातून दागिने चोरले होते. स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विशाल तांदळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून १६ तोळे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम चांदीचे दागिने आणि सीबीझेड मोटारसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तपास केला.