पुणे : नातवाच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले कुख्यात बंडू आंदेकर, त्यांची भावजय व माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांना पुणे महापालिकेची आगामी निवडणूक लढविण्यास विशेष मकोका न्यायालयाने परवानगी दिली आहे. ‘निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून त्यासाठी न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही,’ असे स्पष्ट करत विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी तिघा आरोपींवर कोणताही निवडणूक-प्रतिबंध नसल्याचे नमूद केले. नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर (गणेश कोमकरचा मुलगा व वनराज आंदेकर हत्याकांडातील आरोपी) याची गोळ्या घालून हत्या झाली होती. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (७०), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०) आणि सोनाली वनराज आंदेकर (३६) यांच्यासह सुमारे १५ आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी परवानगी मागणारा अर्ज अॅड. मिथुन चव्हाण यांच्या माध्यमातून सादर करण्यात आला. लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार आरोपींना निवडणूक अर्ज दाखल करण्याचा अधिकार असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत तिघा आरोपींना नियमानुसार निवडणूक लढविण्याची मुभा दिली. न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, नामांकनपत्र दाखल करणे किंवा निवडणुकीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करताना पोलिस बंदोबस्ताची गरज भासल्यास त्यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करावा; संबंधित परिस्थितीचा विचार करून त्यावर आदेश दिले जातील.