Pune : उपअधीक्षकासह भूकरमापकाविरुद्ध गुन्हा

पुणे – जमिनीची मोजणी करत नसल्याने राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केल्याच्या रागातून जमिनीची मोजणी करून चुकीची क प्रत तयार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह भूकरमापकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी उपअधीक्षक शिवप्रसाद गौरकर, भूकरमापक आकाश माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत संतोष जानकीराम राय (रा. सिल्वर इस्टेट, एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राय यांना त्यांच्या जागेत बांधकाम करायचे होते. त्यासाठी त्यांनी भूमिअभिलेख हवेली कार्यालयाकडे मोजणीसाठी अर्ज केला होता.
अनेकदा विनंती करूनही मोजणी होत नसल्याने यांनी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे (नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट) तक्रार केली. आयोगाने तक्रारीची दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे सूचित केले होते. त्यानंतर भूकरमापक आकाश माने यांनी जागेवर येऊन मोजणी केली. राय यांच्या क्षेत्राचा सर्व्हे क्रमांक चुकीचा दाखवून क प्रत तयार केली.
राय यांची जागा नकाशावर न दाखवता उपअधीक्षक शिवप्रसाद गौरकर यांनी कागदपत्रांची पडताळणी न करताच क प्रतीवर स्वाक्षरी केली. राय यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. नकाशावर मालकीची जागा दिसत नसल्याने नुकसान झाल्याचे राय यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.





