प्रभात वृत्तसेवा पुणे – मालकिणबाईंच्या धमकावणीमुळे रामदास भरत पवार ( ३०) या तरुणाने सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली. याप्रकरणी दोन महिलांसह सातजणांविरुद्ध येवलेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.रामदासला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे, मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पवार यांची बहीण रुपाली संतोष पुजारी ( ३३, रा. बाळासाहेबनगर, लोणंद, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रामदास हे येवलेवाडीतील शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलून येथे कारागीर म्हणून काम करत होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्याशी त्यांचा वाद झाला होता. आरोपींनी पवार यांना पोलिसांकडे तक्रार करतो, अशी धमकी दिली. तक्रार देऊ नये यासाठी पवारकडे आरोपींनी पाच लाख मागितले होते. आरोपींच्या त्रासाची पवार यांनी बहिणीला कल्पना दिली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी वही, तसेच समाजमाध्यमात आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. ३० डिसेंबर रोजी लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. पवार यांच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करत आहेत.