प्रभात वृत्तसेवा पुणे – मासळी बाजारातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दाखल गुन्ह्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह दोघांना अटक केली. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी बंडू आंदेकर, त्याचा पुतण्या शिवम यांना २८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर, पुतण्या शिवम उदयकांत आंदेकर यांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणात बंडू आंदेकर, शिवम आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह ११ जणांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गणेश पेठ मासळी बाजारातील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. बंडू आंदेकर, शिवम आंदेकर यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. विलास पटारे यांनी केली. आरोपींच्या बँक खात्यात २१ कोटी ६० लाख रुपये आहेत. ही रक्कम मासळी बाजारातील व्यावसायिकांकडून खंडणीपोटी उकळलेली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.आरोपींच्या वतीने ॲड. मिथुन चव्हाण, ॲड. ए. एस. धिवार यांनी बाजू मांडली. आरोपींना या गुन्ह्यात गोवले असून, पोलीस कोठडीची आवश्यकता नाही, असे ॲड. चव्हाण यांनी युक्तिवादात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालायने आंदेकर याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांवर ताशेरे आरोपी कृष्णा आंदेकर हा येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची पोलिसांनी नाना पेठ परिसरात धिंड काढली, अशी तक्रार बचाव पक्षाचे वकील ॲड. चव्हाण यांनी न्यायालयात केली. धिंड काढल्याने मानवी प्रतिष्ठेला हानी पोहोचली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ॲड. चव्हाण यांनी सांगितले. या तक्रारीची विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी दखल घेतली. पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींची सार्वजनिक ठिकाणी परेड काढणे हे कायद्याला अपेक्षित नाही, तसेच योग्यही नाही. आरोपींची पोलीस कोठडी योग्य उद्देशासाठी वापरावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले.