पुणे -शहरातील वडगाव शेरी या गावातील मिळकतींची मोजणी केल्यानंतर आता खराडी येथील मिळकतींची मोजणी करण्यात येणार आहे. ईटीएस मशिन आणि रोव्हरच्या तंत्रज्ञानाबरोबरच प्रथमच ड्रोन तंत्रज्ञनाचा वापर करून मिळकतींची मोजणी करण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक मिळकतींचा प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. तसेच तंत्रज्ञानाचा एकत्रितरित्या वापर केल्यानंतर मोजणीचा कालावधी, त्यातील अचूकता यांचा अभ्यास करून भविष्यात महापालिकेच्या हद्दीतील सर्वच गावांची मोजणीचे काम या माध्यमातून करण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हेचे काम झाले आहे, परंतु अशा शहरात मिळकतींचे सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड अशी दोन्हीही सुरू आहेत. अथवा, सिटी सर्व्हे झाले असून देखील सातबारा उतारा सुरू आहे. त्यामुळे अशा शहरात जागांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराच्या वेळी सोईनुसार सातबारा उताऱ्यांचा वापर केला जातो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. फसवणुकीचे प्रकार देखील वाढत आहेत. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने सिटी सर्व्हे झालेल्या भागातील सातबारा उतारे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने “एनआयसी’च्या मदतीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या वापर करून प्रायोगिक तत्वावर वडगाव शेरी या गावामध्ये जीएआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नुकताच एक प्रकल्प राबविण्यात आला. त्यामध्ये रोव्हर आणि ईटीस मशिनचा वापर करून 35 दिवसांमध्ये या गावाची मोजणी पूर्ण करण्याचा नवा विक्रम भूमी अभिलेख विभागाने केला. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता खराडी गावाची मोजणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या मान्यतेने भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. मात्र यंदा रोव्हार, ईटीस मशिन आणि ड्रोन अशा तिन्ही तंत्रज्ञानाचा वापर एकत्रित करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.
याविषयी माहिती देताना भूमी अभिलेख विभागाचे पुणे प्रदेश संचालक किशोर तवरेज यांनी सांगितले की, उंच इमारतींमुळे अनेकदा रोव्हरचा वापर करण्यास मर्यादा येतात.त्यामुळे ज्या भागात उंच इमारती आहेत, अशा भागात ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तर काही भागात रोव्हर आणि ईटीएस मशिनचा वापर करून मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या दोन्हीतील अचूकता तपासण्यात येणार आहे. त्यामध्ये मोठी तफावत नसेल, तर भविष्यात या तंत्रज्ञानाच्या या पद्धतीचा वापर करून महापालिकेच्या हद्दीतील गावांची मोजणी गतीने पूर्ण करणे शक्य होणार आहे.