पुणे – एका नगरसेविकेचा मुलगा तब्बल 1 लाख 80 हजाराचे दागिने रिक्षामध्ये विसरला होता. स्वागरेट पोलिसांना ही तक्रार प्राप्त होताच त्यांनी तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेज तपासात रिक्षावाल्याचा माग काढला. यानंतर रिक्षा चालकाच्या घरातून हे दागिने हस्तगत केले. ही कारवाई स्वारगेट पोलिसांनी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, नगरसेविका कविता वैरागे यांचा मुलगा स्वारगेट परिसरात एका रिक्षामध्ये बॅग विसरला होता. यामध्ये साडेचार तोळयाचे सोन्याचे दागिने होते. याची किंमत जवळपास 1 लाख 80 हजार इतकी होती. त्यांनी स्वारगेट पोलिसांना याची खबर दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई ज्ञाना बडे व भोकरे यांनी जवळपास 100 सीसीटीव्ही तपासत रिक्षाचा माग काढला. रिक्षाच्या नंबरवरुन रिक्षा मालक कात्रजला रहात असल्याची माहिती मिळाली.
त्यानूसार कात्रज येथे जाऊन रिक्षा चालकाची चौकशी केली. त्याने रिक्षात विसरलेली पिशवी पोलिसांकडे सुपूर्त केली. त्याला पिशवीमध्ये दागिने असल्याचे माहित नव्हते. वैरागे यांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतूक केले आहे.