रविवार दि. २२/३/२०२० रोजी येरवडा क्षेत्रिय कार्यालयाकडे अत्यावश्यक सेवेत कचरा वाहतूक विभागात काम करणारा कंत्राटी सेवक प्रतिक केगळे यांना सकाळी कामावर जात असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुकारलेल्या जनता कर्फ्यूमध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली. अंगावर खाकी गणवेश होता पण त्याच्या जवळ ओळखपत्र नव्हते म्हणून पोलिसांनी काठीने बेदम मारहाण केली.
आपत्कालीन परिस्थितीत कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यासंबधी संबंधीत ठेकेदारांना प्रशासनाने भाग पाडावे अशी मागणी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केली आहे. कंत्राटी कामगारांच्या सर्व प्रश्नांच्यासंदर्भात लेखी निवेदनाद्वारे मागणी करून देखील संबंधित ठेकेदार व प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप युनियनच्या जनरल सेक्रेटरी काॅ. मुक्ता मनोहर यांनी केला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तेही अत्यावश्यक सेवेतील कंत्राटी कामगारांना ओळखपत्र नाही या कारणावरून पोलिसांनी मारहाण करावी ही प्रशासनाच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे.
संपूर्ण जगभर कोरोना व्हायरसच्या संसर्गाने मानवाला ग्रासून मृत्यूने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीने सफाई करणाऱ्या कामगारांच्या जीवावर सामाजिक व प्रशासकीय यंत्रणा जीवावर उठत असेल तर युनियन म्हणून कदापीही अन्याय सहन करणार नाही. पोलीस यंत्रणेला सुध्दा पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे नम्र आवाहन आहे कि, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय कंत्राटी कामगारांना मारहाण करू नये. तसेच सर्व खात्यातील कंत्राटी कामगारांना त्वरित ओळखपत्र देण्यात यावे असे आवाहन पुणे महानगरपालिका कामगार युनियनने केले आहे.