Pune : कोथिंबिर महाग, मेथी स्वस्त; मेथीची आवक दुपटीने वाढली

पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात कोथिंबिरीची आवक घटली आहे. जिल्ह्यासह विभागात पावसाने हजेरी लावल्यामुळे ही आवक घटली आहे.
त्यामुळे घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ५ रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार जुडीला १५ ते २० रुपये भाव मिळत आहे, तर किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांनी विक्री होत आहे.
याबरोबरच अंबाडी आणि चुकाच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे १ रुपयांनी वाढ झाली आहे. मेथीची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. मागील आठवड्यात ३० हजार जुडी आवक असलेल्या मेथीची ६० हजार जुडी आवक झाली. परिणामी मेथीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे १० रुपयांनी घट झाली आहे. घाऊक बाजारात मेथीच्या जुडीला १२ ते १५ रुपये भाव मिळत आहे.
याबरोबरच पुदीना आणि चवळईच्या भावात जुडीमागे १ रुपयांनी घट झाली आहे. मागील आठवड्यात १ लाख जुडी आवक झालेल्या कोथिंबिरीची आज ८० हजार जुडी आवक नोंदविण्यात आली.




