Pune: कोथिंबीर-५०, मेथी ४० रुपयांना जुडी; भाव आवाक्याबाहेर

पुणे – मान्सूनपूर्व पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. विशेषत: कोथिंबिर आणि मेथीला त्याचा फटका बसला आहे. दोन्ही भाज्यांची आवक कमी झाली आहे. होणाऱ्या आवकमध्ये दर्जाहिन आणि खराब मालाचे प्रमाण लक्षणीय आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरच्या जुडीला ५० रुपये, तर मेथीच्या जुडीला ४० रुपये मोजावे लागत आहेत. पुढील महिनाभर ही परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
मार्केट यार्डातील तरकारी विभागात शुक्रवारी (दि. १५) पुणे जिल्ह्यासह नाशिक आणि लातूर भागातून १ लाख जुडी आवक झाली. तर मेथीची ३० ते ४० हजार जुडी आवक झाली. पंधरा दिवसाच्या तुलनेत कोथिंबिर आणि मेथीच्या भावात ३० ते ४० टक्केंनी वाढ झाली आहे. दर्जाहिन माल बाजारात आहे. मात्र, त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. कोथिंबिर, मेथी तर भाव तेजीत असून, उर्वरित प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावातही २० ते ३० टक्केंनी वाढ झाली आहे.
पंधरा दिवसात वाढ
बाजारात पंधरा दिवसांपूर्वी कोंथिबीरची जुडी ५ ते १० रुपयांना मिळत होती. मात्र, अवेळी झालेल्या पावसामुळे कोथिंबीरची आवक माेठ्या प्रमाणात घटली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कोथिंरीचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीला १५ ते ३० रुपये भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात एका जुडीसाठी तब्बल ५० रुपये माेजावे लागत आहेत.





