पुणे – आगारांमध्ये मतदानाची होणार सोय

पुणे – एसटीच्या वाहक आणि चालकांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी एसटी महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार वाहक आणि चालकांना लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांमध्येही मतदान करणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित आगार प्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी सर्व आगारांमध्ये मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, अशी सोय उपलब्ध करून न दिल्यास त्यासंदर्भात एखाद्या वाहक अथवा चालकाने तक्रार केल्यास त्यासाठी आगार प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे वाहक आणि चालकांना त्यांच्या मतदानाचा हक्‍क बजाविता येणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने स्वतंत्र यंत्रणा तैनात करण्यात आली होती. ही यंत्रणा तैनात करण्यात आल्याने राज्यभरातील हजारो पोलीस, होमगार्ड, सुरक्षा दलाचे जवान आणि अन्य सुरक्षा रक्षकांना मतदानाचा हक्क बजाविता येत आहे. त्याशिवाय निवडणुकांच्या कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही सरकारच्या वतीने खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कामावर हजर असतानाही मतदान करणे शक्‍य झाले आहे. मात्र, एसटीचे चालक आणि वाहक यांना मतदानाचा हक्क बजाविता येत नव्हता. त्यामुळे या कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

त्यामुळे या कामगारांनी एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे त्यासंदर्भात लेखी तक्रारी केल्या होत्या, त्याशिवाय यासंदर्भात मागील महापालिका निवडणुकांच्या दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडे लेखी विचारणा केली होती, त्यावेळी बसेसच्या फेऱ्या आणि उपलब्ध मनुष्यबळ यामुळे ही बाब शक्‍य नसल्याचे महामंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ही बाब मान्य करावीच लागेल अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली होती. अखेर यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदान केंद्रासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची तयारी एसटी महामंड्‌ळाने दर्शवली असून त्याबाबत प्रशासनाच्या वतीने तयारी सुरु करण्यात आली आहे अशी माहिती एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक माधव काळे यांनी दिली.

मतदानाच्या दिवशी देणार प्रशासकीय सुट्टी…!
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल महिन्यात चार टप्प्यात निवडणूका होत आहेत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या भागात सरकारी सुट्टया जाहीर केल्या आहेत. मात्र, एसटी महामंड्‌ळाच्या वतीने त्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने एसटी महामंडळाला विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे याची गंभीर दखल घेत मतदानाच्या दिवशी त्या त्या विभागानुसार प्रशासकीय सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहितीही काळे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.