पुणे : यशवंतराव चव्हाणांना अभिप्रेत असलेला पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करण्यात तर्कतीर्थांनी बौद्धिक योगदान दिले. राज्याच्या वैचारिक प्रबोधनात तर्कतीर्थांनी मोठे योगदान आहे. यासाठी आपण त्यांच्या ऋणात राहायला हवे, अशी भावना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदानंद मोरे यांनी सोमवारी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या वतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित डॉ. सुनीलकुमार लवटे संपादीत तर्कतीर्थांच्या साहित्यावर चर्चासत्र आयोजित केले होते. या वेळी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजा दीक्षित, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, शिरीष चिटणीस उपस्थित होते. महाराष्ट्रात अनेक विचार प्रवाह आहेत. यात उदारमतवाद, गांधीवाद, साम्यवाद, समाजवाद आणि ब्राह्मणेतरवाद अशा अनेक विचारधारा असताना तर्कतीर्थांनी तर्कावर आधारलेली ठाम भूमिका घेऊन वैचारिक प्रबोधन केले, असे मोरे म्हणाले.