Pune : जीबीएस रुग्णांची मदत सुरू ठेवा

पुणे : महापालिकेकडून शहरातील गुलेने बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) बाधा झालेल्या रुग्णांना शहरी गरीब योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्यात येत आहे.
मात्र, ही साथ आटोक्यात आल्याने प्रशासनाने ही मदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, महापालिकेकडूनच शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याने जीबीएसचा प्रादूर्भाव वाढला असून, महापालिका प्रशासनाने आणखी दोन महिने ही मदत सुरू ठेवावी, अशी मागणी आपले पुणेच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे पत्र महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नांदेड गाव, तसेच सिंहगड रस्त्यावरील काही परिसरात या साथीच्या आजाराचे रुग्ण सापडले होते. दरम्यान, या आजारावरील उपचाराचा खर्च अधिक असल्याने महापालिका प्रशासनाने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनुसार शहरी गरीब योजनेचा सभासद असल्यास २ लाख रुपये तर इतर रुग्णांना १ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती, तसेच त्यासाठीचे क्षेत्रही निश्चित केले होते.
आतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे ३५ जणांना ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेसाठी ही मदत मोठी नसल्याने आणखी काही महिने तरी ती दिली जावी, अशी मागणी आपले पुणेचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.




