पुणे – तीर्थक्षेत्र विकास मुदतीत पूर्ण व्हावा

आढावा बैठकीत विभागीय आयुक्‍तांचे आदेश

पुणे – विभागातील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध मंजूर कामांचा सर्व यंत्रणांनी आढावा घेऊन, आपापसात ताळमेळ ठेवावा आणि मंजूर विकास कामे मुदतीत पूर्ण करावीत, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयातील श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ मार्ग, श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा आणि श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचा आढावा घेण्यासाठी डॉ. म्हैसेकर यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भूसंपादन उपायुक्त जयंत पिंपळगांवकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण बैठकीला उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र परिसराचा विकास करुन त्याठिकाणी भाविकांना आवश्‍यक सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांना यापूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी दिलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल संबंधित जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सादर केला. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कालबद्ध नियोजन करुन, आवश्‍यक असल्यास अनुदानाची मागणी वेळेवर करुन, सुरू असलेली कामे मागे पडणार नाहीत, याची काटोकोरपणे दक्षता घेण्याची सूचना डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केली.

ही कामे प्राधान्याने होणार
श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर येथील माणकेश्वर वाडा व मुख्य मंदिराभोवतीचा परिसर विकसीत करणे, श्री क्षेत्र भिमाशंकर येथील सामुहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, महादेव वन, दगडी मंडप बांधकाम, मिडी बसेस तसेच श्री क्षेत्र देहू व आळंदी पालखी मार्गावरील व पंढरपूर येथील सुरू असलेल्या विकास कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.