पुणे – 1 हजार 1 योजनांची कामे पूर्ण : टंचाईच्या कामांना वेग

540 कामे प्रगतीपथावर


जिल्ह्यात 4 हजार 96 योजनांचे सर्वेक्षण


1 हजार 877 योजना योग्य असल्याचा निष्कर्ष

पुणे – दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून 95 कोटी 81 लाख 92 हजार रुपयांचा टंचाई आराखडा मंजूर केला आहे. टंचाईच्या कामांसाठी आचारसंहिता शिथील केल्यानंतर पुन्हा एकदा टंचाईच्या कामांना वेग आला आहे. प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवून निविदा प्रक्रियांसह कामे तत्काळ सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात 4 हजार 96 सर्वेक्षण करून 1 हजार 877 योजना योग्य असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यापैकी 1 हजाराहून अधिक कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

मंजूर केलेल्या आराखड्यात 4 हजार 96 योजना तयार करण्यात आल्या. सर्वेक्षणानंतर योग्य ठरलेल्या योजनांपैकी 1 हजार 680 योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी 32 कोटी 27 लाखांचा निधी लागणार आहे. दरम्यान, 1 हजार 595 कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून 1 हजाराहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. तर 540 कामे प्रगतिपथावर आहेत. आराखड्यानुसार आतापर्यंत 509 विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. 149 ठिकाणी काम प्रगतिपथावर आहेत. नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीची 52 कामे पूर्ण झाली आहेत. विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीचे 396 कामे पूर्ण झाली आहेत.

योग्य पद्धतीने नियोजन करून नागरिकांना टंचाईची झळ जास्त जाणवू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. निविदा प्रक्रिया काढण्याचे काम वेगाने सुरू असून कामे तत्काळ पूर्ण करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. टंचाई आराखड्यासंदर्भात दैनंदिन आढावा घेतला जातो.
– सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प.

Leave A Reply

Your email address will not be published.