पुणे, -पुणे जिल्ह्याने मागील दोन वर्षांत सातबारा उताऱ्यावरील नोंदी निर्गती, सातबारा विसंगती दुरुस्ती व तक्रार प्रकरणांचे प्रमाण कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केली आहे. ई-चावडी प्रकल्पामध्ये देखील पुणे जिल्हा अग्रक्रमांकावर ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले. जिल्ह्यात ई-चावडी प्रकल्प राबवण्यासाठी आयोजित तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी पुणे विभागाचे महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी तथा ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयक सरिता नरके, उपजिल्हाधिकारी संजय तेली आदींसह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी देशमुख म्हणाले, ई-पिक पाहणीमध्ये देखील जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच धर्तीवर शासनाच्या “महसूल वाढीमध्ये लक्षणीय वाढ करणे’ हे उद्दीष्ट असलेल्या ई-चावडी प्रकल्पातही अग्रक्रमावर रहावे. यावेळी राज्य समन्वयक नरके यांनी ई-चावडी, ई -हक्क, ई-फेरफार या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाबाबत मार्गदर्शन केले. तसेच ई-चावडी व ई-फेरफारमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे निराकरण केले. कार्यशाळेत मंडळ अधिकारी, तलाठी यांनी चर्चासत्रात भाग घेत आपली मते व अपेक्षा व्यक्त केल्या. महसूल विभागात गेल्या काही दिवसांपासून अनेक नवनवीन बदल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना जलद सेवा मिळू लागल्या आहेत. महत्त्वाकांक्षी प्रकल्प ई-चावडी हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अकृषिक कर व शेतसारा भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच तलाठी दप्तरातील गाव नमुने 1 ते 21 यांचे संगणीकरण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे कामकाज जिल्ह्यामध्ये 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील 906 गावांमध्ये ई-चावडी प्रकल्पामध्ये डाटा एन्ट्रीचे कामकाज सुरू केलेले आहे.