प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरातील तापमानात घसरले असून थंडी जाणवू लागली आहे. आज, महाबळेश्वरपेक्षा पुणे अधिक गारठले. सलग दुसऱ्या दिवशी पारा ९ अशांवर घसरला आहे. या हंगामातील सर्वात कमी तापमान हवेली परिसरात किमान ९ अंश सेल्सिअसने नोंदले गेले आहे. शहरातील अन्य भागासह जिल्ह्यातही पारा एक ते दोन अंशाने घटला आहे. माळीण येथे ११.२, तळेगांव दाभाडे ११.७, पाषाण येथे १२.३ तर शिवाजीनगर येथे १२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.पुण्यातील काही भागात पारा एक आकडी आला आहे. आज सकाळी पाषाण, बावधन, एनडीए, खडकवासला, कात्रज, जांभूळवाडी परिसर धुक्यांत हरवला होता. या परिसरासह शहरात सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत गारवा जाणवत होता. शहराच्या मध्यवर्ती भागातही थंडीचा जोर कायम आहे. दुपारी उशीरपर्यंत कोवळे ऊन जाणवत आहे. सायंकाळी थंडी जाणवत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत शहरातील किमान तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार आहे. आजचे किमान तापमान हवेली ९.७, माळीण ११.२, तळेगांव दाभाडे ११.७, दौंड १२.१, पाषाण १२.३, आंबेगाव १२.४, शिवाजीनगर १२.७, बारामती १३.२, गिरीवन १४.३, भोर १४.७, चिंचवड १६.५, कोरेगांव पार्क १६.७, वडगांवशेरी १७.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.